स्वराज्य जननी जिजामाता भाग २५ : १६ ऑक्टोबर २०२०

0
92

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलेत की, आदिलशहाचा कपटाचा डाव…शहाजी महाराज साहेब आणि जिजाऊंच्या मनावर घाव घालत…यशस्वी झाला होता…पोटच्या मुलाच्या लग्नाला हजर राहता न येण्याचं दुःख महाराज साहेबांच्या बापमनाला काय यातना देत असतील…हे जिजाऊंच्या बापमनाने जाणले होते…

त्यामुळे निराश झालेल्या आऊसाहेबांची निराशा… जाणतेपणाने आणि जाणतेमनाने शिवबांनी दूर केली होती… याशिवाय, “आमचे आबासाहेब लग्नात नसल्याने कोणाला आनंद होणार असेल तर आम्ही त्याला तो आनंद घेऊ देणार नाही…तुमच्यातच आम्ही आबासाहेब पाहू…” असे म्हणून जिजाऊंचे दुःख शमवले होते…शिव सईंचे लग्न लागले..जणू शिवाला शक्तीने वरले…एक अलौकिक सोहळा पार पडला..जिजाऊंच्या आऊ आणि आबा या दोन्ही हातांनी… शिवबांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात फिरवला गेला… आणि अशातच…या सगळ्या चैतन्यमयी वातावरणाचे चैतन्य.. कैक पटीने वाढवणारा महाराज साहेबांचा खलिता आला होता…


“आदिलशहाने आम्हाला जाण्यास अडवणूक केली पण कोणाच्याही येण्यास नाही… तडक निघून यावे…” असं सांगणारा मजकूर असलेला…
आदिलशहाच्या असुरी आनंदाला फार काळ टिकू न देणारा…हा प्रतिडाव एका बापमनाने आखला होता…


महाराज साहेबांनी बोलावल्यामुळे जिजाऊंना आणि शिवबांनाही तीन वर्षानंतर आपल्या देवाचे दर्शन घडणार होते…आणि कोणाच्याही कानोकान खबर नसताना… जिजाऊ शिवबा सईंना सोबत घेऊन… बंगळुरूला आपल्या देवाच्या भेटीला आले होते…


शहाजीराज्यांच्या या अनपेक्षित खेळीमुळे…आदिलशहा पुरता डिवचला गेला होता…
एकीकडे, पतीविरहात तीन वर्षे, तीन तपांसारखे काढल्यानंतर जिजाऊंच्या पत्नीमनाला अतोनात समाधान मिळाले होते…पुणे वसवताना झालेली दमछाक, केलेला त्याग, आलेला राग, आणि पुण्याची फुललेली बाग;सगळं सगळं व्यक्त होऊन आपल्या पतीराजांच्या शाबासकीची थाप मिळवली होती…”आभाळात कडाडतात त्या विजा आणि धरतीवर या शहाजीची जिजा” या शब्दांनी जिजाऊंच्या जबाबदारीचा भार आणखीन वाढवला होता…शिवाय, शिवबा आणि त्यांच्या आबासाहेबांच्या भावनांचे सारे बांध फुटले होते…तर दुसरीकडे,आदिलशहाच्या दरबारातुन इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी फर्मान सुटले होते…


जिजाऊंचे माहेर ज्या घातकी आमंत्रणाने संपवले होते…तसेच आमंत्रण जिजाऊंचे कुटुंब संपवण्याचा हेतू दडवून…शहाजी महाराजसाहेबांच्या हाती पडले होते…
मात्र,ज्याने आमच्या आईवडिलांची ताटातूट केली त्याला आम्ही का भेटावे?” असा प्रश्न उपस्थित करत…आदिलशहाच्या विजापूरला न जाण्यासाठी…शिवबांनी प्रखर विरोध दर्शवला होता…आणि शिवबा त्यांच्या आऊसाहेबांशिवाय दुसऱ्या कोणाचेच ऐकणार नाहीत हे उमजून… महाराज साहेबांनी शिवबांची समजूत काढून त्यांना विजापूरला येण्यास तयार करावे…ही जबाबदारी जिजाऊं वर सोपवली गेली होती…


“जिजाऊंनी शिवबांची विजापूरला येण्याबाबत समजूत काढण्याऐवजी.. विजापूरला समजून घ्या… असं म्हणत… आपल्या बारामावळात फिरलात आता शत्रूच्या विजापुरात फिरा… अनुभवांचे बाण तुमच्या भात्यात साठवा…पुढे जाऊन हेच तुम्हाला उपयोगी पडतील…”शत्रूचे सामर्थ्य ठाऊक असेल तर, आणि तरच बलाढ्य शत्रूवर मात करता येते…असे बोलून जिजाऊंनी शिवबांना विजापूरास येण्यास अधीर केले होते…परंतु, विजापूरच्या वाटेवर आदिलशहाचे कपट दबा धरून बसले होते…
शहाजीराज्यांच्या कुटुंब कबिल्याला इजा पोहचवण्यासाठी कासमखान आणि त्याच्या माणसांनी यात्रेकरू वेष धारण करून शिवबांवर हल्ला चढवला होता…मात्र जिजाऊंच्या सजगतेने आदिलशाही कारस्थान पुन्हा एकदा उधळून लावले होते….


एका स्त्रीने भीमपराक्रम गाजवून.. अहंकार वेळोवेळी ठेचल्यामुळे, आदिलशहा हैराण हैराण झाला होता… त्यामुळे विजापूरात आलेल्या जिजाऊ आणि शिवबांच्या स्वाभिमानाला डिवचुन… शहाजी महाराज साहेबांच्या अपमानाचा खेळ त्याने चालवला होता…त्यांच्या नेहमीच्या मुक्कामाच्या वाड्यात नायकीनी आणून ठेवल्या गेल्या होत्या….


वडिलांचा सहवास म्हणजे अमृताचा पाऊस मानणाऱ्या…आऊ आबांमध्ये देव पाहणाऱ्या…शिवबांना ही अपमानास्पद वागणूक सहन होत नव्हती… शिवबांच्या डोळ्यात… जिजाऊंनी भरलेल्या स्वाभिमानी अंजनाने तीक्ष्ण झालेली नजर…संकल्पलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी.. पराकोटीच्या संयमशील, विचारशील आणि धोरणी शहाजीराज्यांना आतून सुखावून गेली होती…शिवबांचे तेजपुंज डोळे बेदरकारपणाची आग ओकत होते…हे पाहून, “शिवबांनी संयम ठेववा…
अन्यथा नियोजित गोष्टी सत्यात उतरणे शक्य होणार नाही…”अशी काळजी महाराज साहेबांना वाटत होती…
लेखिका- पुनम कुचेकर, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here