आत्तापर्यंत स्वराज्य जननी जिजामाता भाग 24 : 13 ऑक्टोबर २०२०

0
49

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलेत की,
शिवबाराजेंनी कवड्यांची माळ मिळवून जणू शिवधनुष्यच पेलले होते…जिजाऊंनी माळेत ओवलेला “व” शिवबाराजेंना वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध करणारा ठरला होता…परंतु,या सगळ्या धामधुमीतुन मोकळीक मिळताच दुसरी कसोटी जिजाऊंच्या समोर आली होती..शिवबाराजेंच्या लग्नाची…


स्वतःला सिद्ध करत, जिजाऊंच्या हातून कवड्यांची माळ ज्या गळ्यात घातली गेली होती…त्या गळ्यात वरमाळ घातली जाणार होती…परंतु, ती माळ घालणारे हात सक्षम हवे, शिवबाराजेंच्या लगीनघाईने बारामावळातील हजारो लोकांचा संसार थाटायचा म्हणजे मुलगी कर्तृत्ववान हवी, मायाळू, कनवाळू, आणि प्रसंगी सावली धरणारी असावी…अश्या गुणांनी पोक्त अशी नवरीबाई असावी…


वरबाप सह्याद्री, तर सप्तनद्या वरमाई असाव्या…डोंगर दऱ्या वऱ्हाडी असावेत…असा अलौकिक लग्नसोहळा व्हावा…बारा मावळाने त्यात सहभागी व्हावे…उठून बसावे, उत्साहाने नाहून जावे अशी जिजाऊंच्या मनाची कल्पित योजना होती…
तर,


महाराज साहेबांमुळे आदिलशहाच्या गैरमर्जीतुन मुक्त झालेल्या फलटणच्या मुधोजीराव निंबाळकर यांची गृहशोभा… सईबाईंच्या रूपाने जिजाऊंच्या कल्पनाचित्राला जिवंत केले होते…शिवबाराजेंप्रति असलेली श्रद्धा, त्यांच्या पराक्रमाची असलेली जाण, त्यांच्याप्रति असलेला विश्वास, या सोबतच सर्वगुणसंपन्नता या गोष्टींच्या जोरावर… आपल्या सक्षमतेने जिजाऊंच्या मनात सईबाईंनी स्थान निर्माण केले होते…
शिवबाराजेंचा लोकहिताचा असाधारण संसार सुखाचा करण्याची हमी देणारा…तसेच त्यांना शक्तीस्वरूप साथ करणारा सईबाईंचा सक्षम पदर जिजाऊंनी जोखला होता…
महाराज साहेबांनी मनात आणावे आणि जिजाऊंनी ते ओळखावे…असं एकनिष्ठ मन…एकच विचार करत होते… सईबाईंचे सूनपाऊल भोसल्यांच्या घरात प्रवेशावे…त्यासाठी लगीनघाईने चैतन्याचे रूप धारण केले होते…मात्र, आदिलशहाच्या कपटाने शहाजी महाराज साहेबांचा हा वैयक्तिक आनंदही हिरावला होता…


शिवबाराजेंनी आमीनच्या गुहेत घुसून त्याला ललकारले होते,त्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने शिवबाराजेंच्या लग्नात विघ्न आणण्याचा हर प्रयत्न केला होता…
परंतु, महाराज साहेबांची मोहिमेच्या नावाखाली अडवणूक करण्याचे विघ्न सोडले तर, अन्य कोणत्याही प्रकारे जिजाऊंच्या समोर विघ्न उत्पन्न करण्यात…आदिलशहा यशस्वी होऊ शकला नव्हता…


लेखिका-पुनम कुचेकर, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here